-
वैरागड किल्ला हा गडचिरोली जिल्यातील आरमोरी तालुक्यात खोब्रागडी व वैरोचना नद्यांच्या संगमावर आहे. वैरागड गावाच्या नावावरूनच या किल्यास 'वैरागड' म्हणून ओळखले जाते.
वैरागड चा उल्लेख इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातील हातीगुंफा शिलालेखात आढळतो. त्यात कलिंगसम्राट महामेघवाहन खारवेलने कृष्ण-वेण्णापर्यंतचा प्रदेश जिंकून वैरागडची राजकुमारी 'घुसीता' बरोबर विवाह केल्याचा उल्लेख मिळतो.
ह्यावरून वैरागड हे इ.स.पूर्ण दुसऱ्या शतकापासून अस्तित्वात असून ते इतिहास प्रसिद्ध शहर होते,
याची खात्री पटते.
इ.स. ९ व्या शतकात वैरागड येथे माना जातीच्या नागवंशीय राज्यांनी सत्ता स्थापन केली. या राजवंशातील पहिला राजा कुरुंमप्रहोद याने वैरागड हा किल्ला बांधल्याचा उल्लेख मिळतो.
इ.स. १२ व्या शतकात माना राजानी रतनपूरचा राजा जाजल्लदेव याचे मांडलिकत्व स्वीकारून त्याच्या स्वामीत्वाखाली राज्य कारभार करू लागला.
इ.स. १३ व्या शतकात काही काळ देवगिरीच्या यादवांनी सुद्धा हा किल्ला ताब्यात घेतला होता. यादवांनंतर या किल्ल्यावर गोंडाचे राज्य आले.
यादवांच्या सैन्यातील एक गोंड अधिकारी कोलभिल्ल याने गोंड समाज बांधवांना संघटित करून किल्ला ताब्यात घेऊन राज्यकारभार करू लागला.
माना नरेश कुरुमप्रहोद याने बांधलेला हा किल्ला बहमनीच्या कारकिर्दीत इ.स. १४७४ मध्ये बहमनी सेनापती युसुफ आदिलखानाने स्वारी करून किल्ला बराच उध्वस्त केला, त्यानंतर त्याच जागी गोंड नरेश बाबाजी बलाळशहाने (इ.स. १५७२ ते १५९७) नवीन किल्ला बांधल्याचा उल्लेख मिळतो.
मानावंशीय नरेश कुरुमप्रहोद यांनी बांधलेल्या या स्थलदुर्गाचे रूप आणि रचना कशी होती. या संबंधी माहिती उपलब्ध नाही. परंतु त्याच किल्याची नंतर डागडुजीकरून बाबाजी बल्लाळशहा यांनी उभारलेला किल्ला हा सुमारे १० एकर जागेत उभा आहे.
किल्याची तटबंदीची भिंत ही काळ्या बेसाल्ट पाषाणातील असून आज ती बऱ्याच ठिकाणी मोडकळीस आलेली आहे. किल्याच्या सभोवताल खंदक असून तटाची भिंत सुमारे १५ ते २० फूट उंचीची आहे.
त्यावर आता बरीच झाडे वाढलेली दिसते.
या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिणेस असून त्यास अन्य दोन प्रवेशद्वार आहेत.
प्रवेशद्वाराची स्थापत्यस्तिथी फारशी चांगली नाही. त्यावर झाडे वाढलेली असून भग्नावस्थेत आहे.
किल्यात १ छोटा चबुतरा बघावयास मिळतो. ते किल्लेदाराचे घर किव्हा कचेरी असावे असे समजले जाते.
ह्याच्या काही अंतरावर पायऱ्यांची एक विहीर आहे. त्यातून किल्यातील निवाशियाना पाणीपुरवठा होत असावा.
संदर्भ:-
१) चंद्रपूर जिल्हा गझिटियर पृ.७८१
२) मेजर लुहिस, से.री.चा. डी. १९६९, चंद्रपूर जिल्हा गॅझेटियर प्रु.७६५.
पुस्तक:
चंद्रपूर गडचिरोली जिल्याचे पुरातत्व (प्रागैतीहासिक काळ ते
इ.स. १३ वे शतक)
लेखक-डॉ.
र.रा.बोरकर संकलन :-
वाल्मीक ननावरे. देलनवाडी,
|