-
बैलोचना नदीच्या तीरावर बसलेलं आरमोरी पासून विस किलोमीटर अंतरावर देवखडकी गाव. त्या गावामध्ये मानिकदेवाचे मंदिर आहे. सहज फिरता फिरता मी वाल्मिक नन्नावरे, कुलदीप श्रीरामे आणि गोपाल गराटे मणिकदेव मंदिराचे पुजारी राजीराम तुलावी यांच्याशी भेट झाली. त्यांनी देवखडकी येथील सर्व ऐतिहासीक माहिती सांगितली. मणिकदेव म्हणजेच ठाकूरदेव परंतु, हा माना समाजाचा दैवत म्हणून यास आम्ही माणिकदेव म्हणतो. आमचा देव म्हणून पूजापाठ पण करतो. सदर मंदिर अगोदर टेकडीवर होते. आता आम्ही त्याची स्थापना गावामध्ये केली..
या आदिवासींच्या देवताचा इतिहास राजीराम तुलावी यांनी सांगितल्याप्रमाणे इ.स. ११०० ते १२४० च्या दरम्यान जेव्हा वैरागड इथे माना राजे कुरुमप्रहोद यांची सत्ता होती. तसेच वीरांगना मुग्दाई सुरजागड चे राजे सुरजत बडवाईक (नारनवरे), गड़बोरीचे राजे कोलया याच्या गुप्त बैठका याच अज्ञात ठिकाणी होत होत्या. मुक्तीच्या (मुग्दाई) बाळाचा जन्म याच टेकडीवरील राणी महालात झाला. तो राणीमहाल आजही दगडाच्या रूपात जसाच्या तसा उभा आहे. कोलबा वाघाची गुहा आजही जशीच्या तशी भग्नावस्थेत आहे. सुरजत बडवाईक याची गुहा ( राहण्याचा गुप्त स्थळ) जशाचा तसा आहे. या ठिकाणी माना बाजार भरत होता. ती जागा सुद्धा या ठिकाणी आहे. त्याच काळात इथे खूप मोठे युद्ध झाले. ती युद्धभूमी आजही अस्तित्वात असून त्यावेळी युद्धात मरण पावलेल्या ४०० सैन्यांच्या समाध्या आहेत. त्याच काळात बांधलेला शहीद स्मारक आजही उभा आहे.
माना जमातीचे लोक आजही महाशिवरात्रीला देवखडकीला येऊन मोठ्या श्रद्धेने येऊन दर्शन घेतात. आजूबाजूच्या गावातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने इथे दर्शनासाठी येतात व भव्य दिव्य जत्रा महाशिवरात्रीला भरते. माना जमातीचे मानकर कुळाची कुलदैवत म्हणून माणिकदेव नावारूपास आहे. आजही पूर्ण विदर्भातील आदिवासी माना जमातीतील मानकर कुळातील बांधव मोठ्या भक्तीभावाने महाशीवरात्रीला इथे येत असतात. देवखडकी गावातील आदिवासी बांधव सुद्धा हक्काने व मोठ्या आदराणे सांगतात की हा दैवत आमचा नसून आदिवासी माना बांधवांचा आहे. आम्हि या ठिकानी आदिवासी माना बांधवांचे राज्य होते. कालांतराने ते इथून गेल्यानंतर त्याची धुरा आम्ही आपल्या खांद्यावर घेऊन पूजा पाठ करतो. इतकेच नाही तर इथली सुरजागड पासून तर वैरागड पर्यंतची जमीन सुद्धा माना जमातीच्या मालकीची होती. असे मंदिराचे पुजारी राजीराम तुलावी यांनी सांगितले.
पुजारी राजीराम तुलावी यांनी टेकडीवर नेऊन आम्हाला संपूर्ण माहिती सांगितली. तेथील प्रत्येक ठिकाणी नेऊन माहिती दिली. हे सर्व सांगताना त्यांनी वीरांगना मुग्दाइची विरगाथा सांगितली. त्या काळात युद्ध सुरू असताना सर्व सैन्य मारल्या गेले. ही बातमी मुग्दाईच्या कानावर गेल्यावर मुक्ताईने स्वतःच्या ३ महिन्याच्या बाळाला पाठीला बांधून युद्धस्थळी पोहचली. हे सर्व बघून मुक्तीने सर्व सैन्याच्या पार्थिव शरीराला मूठमाती देण्यास सुरुवात केली. तोच लपून बसलेल्या एका विरोधी सैन्याने मुक्ताईवर वार केला. वार चुकविण्याच्या नादात ती तलवार मुक्ताईचा छातीला लागली. मुक्तीने त्याच्यावर वार करून शत्रूला संपवले. पण संघर्ष इथेच नाही थांबला. मुक्तीची छाती रक्तबंबाळ झाली. बाळाला दूध पाजता येत नव्हतं. मुक्ताईने स्वतः ची साळी फाडून छातीला बांधली. त्यानंतर सर्व सैन्याला मूठ माती देऊन जखमेवर इलाज करण्यासाठी पेरजागड इथं गेली.
या स्थळाबद्दल विशेष आकर्षण असं आहे की वर्तमान काळात आदिवासी असणाऱ्या विविध जमाती आपल्या आपल्यात भांडत आहेत परंतु देव खडकी गावातील माणिक देवाचे स्थळ हे सर्व आदिवासी बांधवांच्या एकतेचे प्रतिक आहे गावातील आदिवासी बांधव एकोप्याने राहत आहे परंतु शहरी बांधव फूट पाडण्याचे कामे करत आहे. असे स्पष्ट निदर्शनास येत आहे.
( पुजारी राजीराम तुलावी यांनी सांगितल्याप्रमाणे संकलित )
संकलन :
वाल्मीक नन्नावरे,
मु. पो. वेलनवाडी.
|