Home

स्थलदुर्ग भुईकोट (वैरागड)

स्थलदुर्ग-(भूईकोट)-वैरागड.
  • विदर्भात चंद्रपूरच्या ईशान्येस ८० मैलावर गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात अतिप्राचीन (भूईकोट) स्थलदुर्ग किल्ला वैरागड येथे आहे. वैरागड हे स्थान अतिशय प्राचीन असून तेथे वैरोचन नावाचा नागवंशीय माना जमातीचा राजा होता. त्याचा मुलगा वज्रांकुर त्याला घुसीता नावाची रुपवान व बुध्दीमान राजकन्या होती. इ.स. पूर्व दुसऱ्या शतकाच्या सुमारास कलिंग (उत्कल) सम्राट महादेघवाहन खारवेल यांनी कन्हावेणा नद्याचा परिसर जिंकला. तसेच असिफनगर उध्वस्त केले त्यानंतर त्यांनी चार वर्षांनी वैरागडावर स्वारी करुन तिला पत्नी म्हणून आपल्या राजधानीस परत गेला. चार वर्षांनी तिच्या पोटी एक सुकुमार बालक जन्मास आला. तो चक्रवर्ती राजा सातवाहन होय. या ऐतिहासिक नगराचा उल्लेख 'हाथीगुंफा' या शिलालेखात आहे. तो लेख येणेप्रमाणे, सत् मंच वसं पसासतो वजीरधरवंती घुसीता धरनी स-मलुक-पद पुजासकुमार" त्यानंतर मधल्या काळातील राज्यांचा इतिहास उपलब्ध नाही. कदाचित मांडलिकत्व स्विकारलेले राजे असावेत, त्यानंतर नागवंशीय राजे वज्रांकुश व विश्वांकुश हे झाले.
    वैरागड हे ऐतिहासिक स्थळ खोब्रागडी व वैलोचना नद्यांच्या संगमावर असून त्याच्या चारही बांजूनी भूईकोट तटबंदीनी हा किल्ला बांधलेला आहे. मुळात प्रत्यक्षात किल्याचे नांव वज्रागड असे असावे. (वज्र - आयुध, महाकठिण) त्याचे अपभ्रंशीत रुप आजचे वैरागड पडले असावे. या संपूर्ण परिक्षेत्रात प्राचिन काळी नागवंशीय नृपतींचे राज्य होते. त्यातच वजांकुराचे वंशज इ.स. ८५० मध्ये नागवंशीय माना नृपती.कुरुमप्रहोद या बलाढ्य राज्याने अंबागड, टिपागड, वैरागड, आरमोरी हा प्रदेश जिंकला व त्यांनी वैरागड येथे स्थलदुर्ग किल्ला बांधला आणि आपली राजधानी स्थापन केली. किल्याच्या प्रवेशद्वारावर नागाचे व हत्तीचे राजचिन्ह होते. गोंड राज्यांच्या कारकिर्दीत हिऱ्यांच्या लोभापायी बहामनी मोहमद्द तिसरा यांनी इ.स. १४१७ मध्ये आपला सरदार युसुफ आदिल खान यास किल्ला जिंकण्यास पाठविले. त्याच वेळेस मुख्यप्रवेशद्वाराच्या भिंतीस काही भगदाडे पाडली त्याच सुमारास हे राजचिन्ह नष्ट झाले असावेत.
    हा भूईकोट किल्ला १० एकर जागेत असून भोवताल संरक्षक खंदक व तटबंदी (अंदाजे १५ ते २० फुट उंच) अजूनही शाबूत आहे. आक्रमणाच्या वेळेस दोन दरवाजे नेस्तनाबूत झाल्याचे आढळते. प्रवेशद्वार अर्धवर्तुळकार असून त्याला तीन द्वार होती. मुख्य प्रवेशद्वार तटबंदीला जोडलेला आहे. किल्याचे अंत भग्न अवस्थेत एक इमारत दिसते. ते बहुदा किल्लेदाराचे निवासस्थान असावे. प्रवेशद्वारावर गणेशाची कोरीव प्रतिमा असून नक्षिकाम पूर्वीचे आहे. द्वारावर सहा डौलदार घुमट आहेत. सुंदर मनोरे व त्याचे आकर्षक बांधकाम यामुळे किल्ल्याचे प्रवेशद्वार अतिशय खुलून दिसते. किल्ल्याच्या चारही बाजूस भूईकोट बुरुज व गोलाकार उर्ध्व तटबंदी आहे. किल्ल्यात अजूनही चार विहीरी आहेत. किल्ल्याच्या अंतर्गत यातून पाणीपुरवठा होत असावा. हत्तीचा हौद ही विहीर अष्टकोनी व निमूळती असून त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. किल्ल्याचे पूर्वेकडील दर्शनीय प्रवेशद्वार भव्य असून त्याची उंची तीन ते चार पुरुष इतकी उंच आहे. आजही भूईकोट भव्य व मजबूत असल्याचे अस्तित्व जाणवते. नागवंशीय माना नृपती कुरुमप्रहोद यांनी प्रथम वैरागड येथे किल्ला बांधून नंतर राजोली, गडबोरी, चिमूर येथे किल्ले बांधले. त्यांनी वैलाचना नदीचे उत्तर तिरावर वैरागड पासून उत्तरेस गांव वसविले. त्या गावाचे नांव त्याच्या नावाच्या आद्यनावावरुन कुरुखेडा असे ठेवले. काही काळानंतर कुरखेडा म्हणू लागले. तेथे प्रशासकीय वाडा होता. त्याच जागेवर पळसगड येथील जमीनदारांनी नवीन वाडा बांधलेला दिसून येतो. वैरागडच्या पूर्वेस पाच मैलावर मानापूर नावांचे गाव वसविण्यात आले. राजा कुरुमप्रहोद हा धर्मशिल, प्रजाहितदक्ष व पराक्रमी होता. तो त्याचे कुलदैवत ठाकुरदेव (महादेव, मोठादेव) यांचा तो परम भक्त होता. त्यांनी आपल्या राज्यात अनेक शिव मंदिर बांधलित. वैरागड येथील भंडारेश्वर, पाताळेश्वर, गोरजाई, ही मंदिरे असून आरमोरी, नागभीड, डोंगरसावंगी येथ त्यांनी शिवमंदिरे बांधलीत, शेतीसाठी अनेक ठिकाणी तलाव निर्माण केले त्यामुळे ते लोकप्रिय ठरले होते.
    चालुक्य सम्राट कुलोत्तुंग द्वितीय राजेंद्र दिग्वीजयास निघाला असता त्यांनी वजीराकर (वैरागड), चक्रकोटय (बस्तर) येथे इ.स. १०७० मध्ये मोठे विजय संपादन केले. त्याकाळी वैरागड येथील नागवंशीय माना जमातीचे राजे होते. काही वर्षानंतर त्यांच्या वंशातील नागनृपती, प्रतापभूषण या पराक्रमी राजांनी चालूक्याची सत्ता झुंगारून दिली. आणि स्वतंत्र राज्य कारभार पूर्ववत सुरु केला. ऐवढेच नाही तर त्यांनी सानगडी, भनारा, व पौनी हा प्रदेश जिंकुन आपल्या राज्यात सामील केला. त्यानंतर नागवंशीय माना जमातीचे स्वतंत्र राजे इ.स. १२४० पर्यंत राज्य करीत होते. याबाबतची माहिती चांदा जिल्हा पहिला सेंटलमेंट रिपोर्ट १८६९ मध्ये दिलेली आहे.
    नागवंशीय माना जमातीचे राज्य अस्तित्वात असतांना राज्यकारभाराच्या दृष्टीने चार पदव्या सरदार, सुभेदरांना दिल्या जात होत्या. १) बडवाईक २) मोकासी ३) भोयर ४) दिवाण. बहुतेक बडवाईक व भोयर या पदव्या नारनवरे या कुळातील शुर व बुध्दिमान इसमांना दिल्या. मोकासी ही पदवी वाघ कुळातील लोकांना दिली आणि दिवाण ही पदवी गजबे कुळातील लोकांना दिल्या होत्या. शेवटचे बडवाईक भामडेळी येथील मनोजी बडवाईक होते. शेवटचे मोकासी गडबोरीचे किल्लेदार कोलबा वाघ होते. हिरापूर येथील गंगारामजी नारनवरे हे भोयर होते. त्या प्रमाणे सारंगगडचे दिवाण बाळाबापू गजबे हे होते. ते १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात शहीद झाल्याचे ऐकण्यात असल्याची कथा आहे.
    जेव्हा मानांचे राज्ये गोंडानी जिंकल्यानंतर माना जमातीच्या लोकांनी आपले शस्त्र खुंटीला टांगून ठेवले व शेती करू लागले. स्वावलंबी व स्वाभिमानी माना लोक हवालदिल बनल्यामुळे थोडेफार भित्रे बनले नंतर ते मोठ्या शेतकऱ्यांकडे शेतीवर शेतमजूर म्हणून काम करु लागले तसेच जंगलातील वनमजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करु लागले. विजेता हा पराजितावर स्वामीत्व करुन त्यांना देशाधडीस लावतात. असा ऐतिहासिक नियम बनलेला दिसतो. त्यामुळेच त्यांचे ऐतिहासिक दस्ताऐवज नष्ट करणे व परंपरा, चालीरीती व भाषा सोडण्यास सक्ति करणे यामुळेच माना लोकांची परंपरा, भाषा सुटलेली दिसून येते, मानांची भाषा बस्तरी-हलबी असू शकते. सद्या मानांची बोलीभाषा झाडीबोली असून अशुध्द व ग्रामीण मराठी भाषा आहे. माना जमात ही चातुवर्ण्य विरहीत असून ती गोंडांची उपजातही नाही. माना जमात ही गणाधिष्ठीत नागवंशीय आदिवासी स्वतंत्र जमात आहे.

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट