-
हे नाव बऱ्यापैकी परिचित असेलच. या व्यक्ती सोबत आमची वैचारिक मित्रता आहे. या व्यक्तीचा मी फॉलोवर किंवा भक्त वगैरे काही नाही. इंग्रजीमध्ये "फॅन" वैगरे असही नाही. आदिवासी विद्यार्थ्यांना जर का व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा असेल तर जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य होते. परंतु जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्याकरिता तपासणी समित्यांकडून होत असलेल्या विलंबाने आदिवासी विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग आणि इतर व्यावसायिक क्षेत्रामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रचंड अडचणी निर्माण होत होत्या. तेव्हा या व्यक्तीने त्याविरोधात 63/2014 ही जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करून जिंकूनही घेतली आणि अशा व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. तेव्हा या माणसाविषयी माहिती पडले. नंतर प्रत्यक्ष भेट झाली ती चिमूर येथील एका सभेमध्ये.
त्या सभेमध्ये या व्यक्तीने मी काम करत असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यप्रणालीवर भरसभेत ताशेरे ओढले. ऑगस्ट 2018 मध्ये विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या मुंडण आंदोलनावर त्यांनी टीका केली. "विद्यार्थी संघटनेने स्वतःचे मुंडन करून घेण्यापेक्षा जो अन्याय करतो त्याचे मुंडन करावे" असे त्यांचे सूचक वक्तव्य कायम स्मरणात आहे. ती टीका अतिशय झोंबणारी होती. त्यामुळे आमच्या विद्यार्थी संघटनेचे सर्व कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. काही कार्यकर्त्यांनी मागे शिव्या सुध्दा घातल्या (आता चित्र उलटे आहे). परंतु मी एखाद्या व्यक्तीविषयी तात्काळ मत तयार करत नाही. त्यामुळे मी त्यांच्या सर्व वक्तव्यांचे निरीक्षण करत होतो. तेव्हा असे लक्षात आले की हा व्यक्ती टीका करत नसून स्वतःच्या मनातील भावना पोटतिडकीने स्पष्टपणे व्यक्त करतोय. समाजातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या कार्यप्रणालीवर ते खूप नाराज आहेत. मनातील खदखद आणि हतबलता ते सर्वांसमोर व्यक्त करत आहेत. हे व्यक्त करत असताना त्यांनी वापरलेल्या शब्दाला धार असल्याने ते सरळ काळजाच्या आरपार जातात. त्यामुळे भगवान नन्नावरे हा अतिशय हेकड आणि अहंकारी माणूस आहे, अशी प्रतिमा मनोमन तयार होऊन जाते. त्यानंतर नाराज मंडळीकडून सुरु होते माणसाच्या बदनामीचे सत्र. त्या व्यक्तीविषयी दूषित ग्रह निर्माण करण्यासाठी नाराज वीरांची एक स्वतंत्र लॉबी काम करायला सुरुवात करते. असं अनेकांच्या बाबतीत झालेले आणि होते आहे. माझ्या मनात सुद्धा या व्यक्तीविषयी ग्रह तयार झाला होता. परंतु प्रत्यक्ष भेट आणि चर्चा झाल्यानंतर सर्व दुराग्रह जमिनीवर कोसळले. हा माणूस अतिशय स्पष्टवक्ता आहे. परंतु कोणाबद्दलही पूर्वदूषितग्रह बाळगताना दिसत नाही. सामाजिक तळमळ आजही कायम आहे. मैत्रीचे संबंध उत्तम जोपासतो. मुळातच अहंकारी ठरवण्याचे निकषच चुकीचे लावण्यात येते. माणूस स्पष्टवक्ता असणे म्हणजे अहंकारी आहे, असं असते का ? 🤔
परंतु त्यांना खालच्या स्तरातील माणूस म्हणून दाखवण्यासाठी अनेक गोष्टींना समोर केले जाते. त्यापैकीच एक म्हणजे त्यांचं महार जातीच्या मुलीशी झालेले आंतरजातीय लग्न. तो एक प्रेमविवाहच होता असा प्रसार त्यांच्याच समर्थनात असलेले लोक आजही करताना दिसतात. (तसं आंतरजातीय प्रेम विवाह केला तरी कुणाचं काहीही बिघडत नाही.) परंतु त्यांचे रीतसर अरेंज मॅरेज आहे. हे बहुतांश लोकांना आजही ठाऊक नाही. तो फक्त लग्नसोहळा नव्हता तर डॉ. बाबासाहेबांच्या "समतेसाठी रोटी बेटी व्यवहार" या तत्वाशी इमान राखून जातिवादाविरोधात केलेले ते एक बंड होते. शुद्ध प्रेमळ अंत:करनाच्या प्रतिका मॅडम संसार उत्तमप्रकारे सांभाळून (भगवान सरांच्या पत्नी) पतीच्या चळवळीत सक्रिय आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तम सांसारिक प्रपंचासाठी जात महत्त्वाची आहे का ? 🤔
नंतर त्यांच्यावर आदिवासी जमातीमध्ये निळ्या झेंड्याचा शिरकाव करीत आहे. असाही आरोप विरोध करणाऱ्यांकडून झाला. परंतु असा आरोप करणारे स्वतः भगवान नन्नावरेला चांगले ओळखत नाही असे वाटते. कारण ते कट्टर आंबेडकरवादी आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातून, भाषणातून आणि वावरण्यातून आंबेडकर आणि आंबेडकरवाद कायम दिसत राहतो. म्हणून डॉ. बाबासाहेबांची एलर्जी असलेल्यांना कदाचित असे वाटले असेल. पण प्रश्न पडतो की जो माणूस स्वतःच्या आणि स्वतःच्या जमातीच्या आदिवासीत्वासाठी दिवस रात्र लढला तो माणूस दुसऱ्या धर्माचा विचार कसा काय करेल? 🤔
हा माणूस मोर्चाचा विरोध करतो, हे अनेक मोर्चे बहाद्दरांना खटकते. परंतु भगवान सरांच्या स्पष्टीकरणतून सांगायचे झाल्यास अस्तित्व दाखवण्यासाठी मोर्चे ठीक आहे.पण जे काम न्यायालयातून होऊ शकते, त्या कामासाठी आंदोलन मोर्चे काढणे म्हणजे लोकांचा वेळ आणि पैसा वाया घालवणे होय. त्यांनीही सुरुवातीला मोर्चे काढले. (वरोरा एसडीओवर आयोजित केलेला **** फोडो आंदोलन माहिती पडले). त्यावेळेस त्यांना मोर्चाला येणार्या लोकांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून धोक्याचे वाटले. एखादा भव्य दिव्य मोर्चा आयोजित केला त्या मोर्चात बरेवाईट झाले तर त्याची झळ निर्दोष लोकांना सोसावी लागेल. हे त्यांना जाणवले. त्यानंतर त्यांनी न्यायालयीन लढाईच्या माध्यमातूनच अनेक प्रश्न यशस्वीरित्या सोडवले. मोर्चाच्या भानगडीत पडून दुसऱ्याचे आयुष्य बरबाद केले नाही. स्वतःची चळवळ चालवत असताना आपल्या कार्यकर्त्यांना सुरक्षित ठेवणे हे चूक आहे का ? 🤔
तरीपण भगवान नन्नावरे प्रत्यक्ष फिल्डवर काम करत नाही, अशा बोंबा आमच्याकडून मारल्या जातात. त्यावेळेस आपल्याला समजून घ्यावे लागते की हा माणूस नागपूर येथील कॉलेजमध्ये पूर्णवेळ प्राध्यापकी करतो. त्याला स्वतःची नोकरी आहे. त्यांच्या कामाचे स्वरूप हे न्यायालयीन लढाया लढणे हे आहे. नोकरी करून सुद्धा अनेक जनहित याचिका त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आहे. नोकरी सोडून फक्त भाषणाच्या कार्यक्रमासाठी तीनशे-चारशे किलोमीटरचा प्रवास करणे, हे वेळेला परवडणारे सुद्धा नसते. तरीपण हा माणूस अनेक सामाजिक काम करत असतो, ही गोष्ट अनेकांना खटकते. त्यामुळे विरोधकांनी त्यांची माहिती महाविद्यालयात प्रशासनाकडून मागितलेली आहे. हे सत्य बहुतांशी लोकांना माहीत नाही. फिल्डवर्कसाठी वेळ जरी देता येत नसला तरी वेगळ्या पद्धतीने म्हणजे न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून समाजासाठी काम करणे हे गैर आहे का ? 🤔
तसेच हा माणूस गोड बोलून समाधान करत नाही म्हणजे आपली गोड बोलून विश्वास घात करणारी नेते मंडळी हवी आहे का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शोधाण्याची गरज आहे. जेव्हा ही उत्तरे मिळतील तेव्हा हा माणूस उलगडत जाईल. आज या माणसाचा जन्मदिवस आहे. वयाची 55 वर्षे त्यांनी पूर्ण केलीत. तरी पण त्यांचा काटक आणि लढाऊ बाणा कायम आहेत. या व्यक्तीला मी कधीच राजकारणी म्हणून बघितलेले नाही. तर एक आक्रमक अॅक्टिविस्ट म्हणून मी कायम यांच्याकडे बघतो. एक सच्चा अॅक्टिविस्ट जो कधीच तत्वाशी तडजोड करत नाही. अन्याय करणाऱ्या शत्रूंना चॅलेंज देऊन बोलतो. त्यांच्यासमोर गुलामसारखे खाली मान वाकवून नाही तर ताठ मानेने उभं राहायला सांगतो. याचक वृत्ती सोडून वाचक बनायला सांगतो. स्वतःची कायदेशीर बाजू मजबूत असेल तर भिक्षेऐवजी हक्काने हिसकावून घ्यायला शिकवतो. कायदेशीर अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देतो. -
वास्तविक,कायदेशीर आणि वैज्ञानिक व्यवहार असणाऱ्या, मातीशी घट्ट नाळ जुळवून ठेवणाऱ्या भगवान सरांबद्दल हे दोन शब्द.
संदर्भ :- Whatsapp.
लिहले कुणी हे मला माहित नाही.....चांगली पोस्ट वाटली म्हणुन शेअर केली.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
|