-
दि. २४ एप्रिल १९८५ च्या शासन निर्णयाप्रमाणे माना हि जमात नाहीच से गृहित धरून शासन निर्णय क्र. सी.बी.सी. १५८४/३०९/का ११, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ३२, दि. २४ - एप्रिल १९८५ हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे. वास्तविक पाहता २०/११/१९९६ रोजी आदिवासी संशोधन संस्था पुणे या ठिकाणी मा. मुख्यामंत्र्याचे सचिव श्री. अरुण बोंगीरवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीच्या वेळी दि. २४/४/८५ च्या शासन निर्णया सोबत जोडपत्रामध्ये पान नं. १७ अ.क्र. १० (१८) वर कॉलम ३ मध्ये 'माना' अनुसुचित जमातीची जी माहिती दिलेली आहे तीला कोणतीही आधार नाही हे मान्य करण्यात आलेले आहे. याच कॉलम ३ मध्ये हल्ली गोंडमाना स्वताःला गोंड म्हणून घेतात असे दाखवून महाराष्ट्रामध्ये 'माना' अस्तित्वात नाहितच अशी पार्श्वभूमी शासन दरबारी तयार करण्यात आली आहे. याच शासन निर्णयातील कॉलम ५ मध्ये माना जमातीची लोकसंख्या १८६९ साली चंद्रपूर जिल्हयाच्या सेंटलमेंट रिपोर्ट मध्ये २९१७५ एवढी दाखविण्यात आली होती आज त्याची लोकसंख्या ३ ते ४ लाख असावी असे दर्शविले असून सदर ‘माना' हे गैर आदिवासी आहेत असे दर्शविण्यात आले आहे. वास्तविक पाहता याच स्टेटलमेंट रिपोर्ट मध्ये उपरोक्त दर्शविलेली लोकसंख्या हि स्वतंत्र आदिमजमात माना दाखविण्यात आली आहे हि वस्तुस्थिती आहे.
चंद्रपूर जिल्हयातील ऐतिहासीक पार्श्वभूमिवर प्रथम नवव्या शतकापासून ते १३ व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत नागवंशीय मानांनी राज्य केले. त्यांच्या कारकीर्दीमध्ये वैरागड, राजगड, सुरजगड, गडबोरी, माणिकगड इ. किल्ले बांधले. या किल्ल्याच्या दर्शनीभागावर नागवंशीयांचे नाग हे दैवत
कोरलेले आहे. १३ व्या शतकाच्या पूर्वाधमध्ये गोंडानी माना राजांचा पराभव केला. व नागवंशीयांचे राज्य संपुष्टात आणले व त्यांनी बांधलेल्या किल्ल्यावरती हत्तीवर आरुढ झालेला सिंह असे चिन्ह कोरलेले आढळते. माना व गोंड हे एक पाठोपाठ चंद्रपूर जिल्हयात हे स्थिरावल्यामुळे व एकमेकांच्या सानिध्यामुळे गोंडमाना असा जोड प्रचार होणे शक्य आहे. गोंडाची भाषा हि गोंडी आहे तर मानांची मुळ भाषा मानाचे भाट म्हणत
असलेल्या वर्गाची असावी. गोंडी हि वन्य भाषा आहे. तीला लिपी नाही. प्रादेशिक सानिध्यामुळे हिंदी, मराठी, तेलगु व कानडी असे शब्द घुसलेले आहे. अशी हि मिश्र भाषा हल्ली प्रचलित आहे. माना जमातीच्या भाषा संदर्भात सुध्दा प्रादेशिक सानिध्यामुळे मराठीचा वापर जास्त होवून ग्रामीण अशुध्द मराठीचे स्वरुप तिला प्राप्त झाले. सास्कृतिक दृष्टया माना व गोंड यांच्यामध्ये कमालीचे साम्य असल्याने एकमेकांच्या सानिध्यात असल्यामुळे सहचर्यातून सारखेपणा दिसून येतो. परंतु विवाहप्रथेमुळे बेटीव्यवहार होत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही जमातीच्या उपशाखेमध्ये वैवाहिक संबंधामध्ये एकमेकांच्या बेटीव्यवहाराला मान्यता नाही. गोंडामध्ये चारदेवे, पाचदेवे, सहादेवे, सातदेवे असे गोत्र आहेत. तर माना मध्ये सुध्दा चारदेवे, पाचदेवे, सहादेवे, सातदेवे व नऊदेवे असे गोत्र आहे. मेजर लुसी स्मिथ ने १८६९ साली माना हे स्वतंत्र आदिवासी जमात दर्शविली आहे.
अनेक शासकीय व निमशासकीय पत्रव्यवहार बघता खालील गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. त्या येणेप्रमाणे :
१) १८६९ साली मेजर लुसी स्मिथ या इंग्रज अधिकाऱ्याने फर्स्ट सेटलमेंट रिपोर्ट ऑफ चांदा डिस्ट्रीक या मध्ये माना ही अॅब ओरीजिनल ट्राईब म्हणून नोंद केली आहे. रसेल आणि स्मिथ या इंग्रज अधिकाऱ्यांनी १९०१ च्या जनगणनेमध्ये माना आदिवासींची लोकसंख्या ३९००० एवढी नमुद करण्यात आलेली
आहे. १९३१ मध्ये सुध्दा जनगणना जात निहाय केली होती त्यावेळेस माना जमातीची लोकसंख्या ५७४७३ होती. अनु.जाती जमाती आदेश १९५६ मध्ये माना जमातीचा समावेश करण्यासाठी हिच लोकसंख्या आधारभूत धरण्यात आली होती.
२) यानंतर महाराष्ट्र शासनाने सुध्दा ५ ऑगस्ट १९६८ साली माना हि स्वतंत्र आदिवासी जमात असल्याबद्दल त्यांच्या शासकीय समाजकल्याण व शिक्षण विभागातर्फे प्राप्त झालेल्या पत्र क्र. सी.बी.सी. १४६८/ २०२७ जे. दि. २२ जुलै १९६८ च्या पत्रानुसार सचिव समाजकल्याण विभाग भारत सरकार, नवी दिल्ली यांना पत्र देवून शिफारस करण्यात आली होती, त्याच प्रमाणे समाजकल्याण विभाग महाराष्ट्र शासन द्वारा पत्र क्र. सी.बी.सी. १०७८/४३४१८/ डी. व्ही. दि. ६ मार्च १९७९ या पत्रानुसार २९ - मार्च १९७९ रोजी माना ही आदिवासी जमातच आहे असा ५ ऑगस्ट १९६८ सालच्या निर्णयाचा पुरस्कार करुन शिफारस केलेली आहे.
३) पत्र क्र. सी.टी.एन. १०८९ (पी)/१ ११०२४/१/८१ डेस्क १ नुसार भारत सरकार, गृहमंत्रालय, जनगणना कार्य विभाग, संचालक कार्यालय, महाराष्ट्र यांचेकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार दि. ५ फेब्रुवारी १९८१ रोजी मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना संदर्भीत केलेल्या पत्रानुसार अ.क्र. १८ वर नमूद केलेल्या सर्व जमाती या स्वतंत्र आदिवासी जमाती आहेत अशी नोंद घ्यावी असे आदेश दिलेले आहेत.
४) तात्कालीन अनुसुचित जाती जमाती कल्याण संसदिय समितिचे अध्यक्ष मा. खा. आर. आर. भोळे यांनी माना हि स्वतंत्र आदिवासी जमात आहे अशा आशयाचे पत्र दि. २३ डिसेंबर १९८० साली मा. नामदार श्री. स्वरुपसिंग नाईक, मंत्री समाजकल्याण विभाग, ९ ऑगस्ट १९८३ रोजी मा.ना. वसंतदादा पाटील, मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना माना आदिवासी जमात असल्याबद्दलची खास टिप्पणी पाठविली होती. त्याचप्रमाणे २ डिसेंबर १९८३ रोजी मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांना माना जमातींना आदिवासी असल्याबद्दलचे प्रमाणपत्र देण्यात यावे अशी सूचना संबंधीत अधिकाऱ्यांना द्यावी असे कळविण्यात आले होते.
५) एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर आणि चिमूर करीता बनविण्यात आलेला १९८० ते १९८५ या मध्ये सुध्दा पान क्र. ३ वर माना हि मेन ट्राईब (प्रमुख जमात) गृहित धरूनच बनविण्यात आला होता. योजनमध्ये ५५२ आदिवासी गावांमध्ये जवळ जवळ ४७५ च्या जवळपास गावे आहेत, त्यामध्ये माना जमात हि प्रामुख्याने अंतर्भूत आहे.
६) जर चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींच्या लोकसंख्येमधून माना जमातीची लोकसंख्या वगळल्यास चंद्रपूर हा जिल्हा आदिवासी होऊ शकत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. त्याच प्रमाणे आदिवासी उपयोजनेअंतर्गत येत असलेल्या आदिवासी बहुल भागामध्ये राजकीय दृष्टया आरक्षण हे माना जमातीच्या लोकसंख्येला गृहित धरूनच आरक्षण ठेवले जाते.
अनुसुचित जमातीचे निकष पूर्ण केल्यामुळेच घटनेच्या कलम ३४२ अन्वये माना या जमातीस अनु. जमाती आदेश १९५६ नुसार महाराष्ट्राच्या अनुसूची जमातीच्या यादीत अ.क्र. १२ वर समाविष्ट करण्यात आले होते व अनु. जमाती सुधारित आदेश १०८/१९७६ नुसार माना जमात अनु. क्र. १८ वर समाविष्ट आहे. परंतु शासन दरबारी मानाच्या दोन जाती म्हणजेच एक गैर आदिवासी माना जात व दुसरी गोंड या जमातीची उपजात माना आदिवासी जमात अशा दोन जाती निर्माण करून महाराष्ट्रात माना ही स्वतंत्र आदिवासी जमात अस्तीत्वात नाही. अशी पार्श्वभूमी तयार करण्यात आली आहे.
उपरोक्त सर्व पार्श्वभूमी व शासकीय अहवाल तसेच ऐतिहासीक पुरावे लक्षात घेता शासन दरबारी निर्माण केलेल्या मानाच्या दोन्ही जाती/जमाती प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीत. माना हि स्वतंत्र आदिवासी स एकच जमात अस्तित्वात असून जी अनुसुचीत जमाती सुधारित आदेश आदेश १०८/१९७६ अन्वये अ. क्र. १८ वर अंतर्भूत आहे. दुसरी कुठलीही माना जात अस्तित्वातच नाही हे निर्वीवाद सत्य आहे .
|