-
जन्म :
माना जमातीतील बाळंतिणीस बाळंतपणाच्या वेळी सात दिवस अशुद्ध समजून कुटूंबापासून अलग असलेल्या खोलीत ठेवत असत. बाळ झाल्यानंतर बाळाची व तिची आंघोळ करण्यासाठी खड्डा खोदल्या जात असे, त्यालाच "न्हाणी" म्हटल्या जात असे. पाचव्या दिवशी बाळाची पडलेली नाळ त्या खड्ड्यात पुरून पुजा करीत असत व त्यावर रात्रभर दिवा तेवत ठेवत असत व सातव्या दिवशी घरातील सगळे कपडे-लत्ते धुवून घरं मातीने सारवून शुद्ध केल्या जात असे त्याला "सातवी" म्हणत असे. या दिवशी मोहफुलापासून तयार केलेले मुट्ठे बायकांना वाटल्या जात असे. बाराव्या दिवशी जमातीतील बायकांना बोलावून बाळाला पाळण्यात घालत व नांव ठेवत त्यावेळेस बाळाच्या पाळण्याखाली घुगऱ्या ठेवत व त्या सर्व बायांना वाटत. या दिवशी आपल्या जमातीच्या रितीरिवाजाने गाणे म्हणण्याची प्रथा होती. बाळाचे नाव प्रामुख्याने निसर्गातील वृक्षांच्या नावांवरून उकारार्थ ठेवल्या जात असे. उदा. डोंगरु, कचरु, पांडू, रंगु, महारु इत्यादी. कारण ही जमातच निसर्गाच्या सान्निध्यात वास्तव्यास होती. बहुतेक बाळंतपणं स्त्रियांच्या माहेरीच केल्या जात असत. बाळंतपणाची कामे परधान जातीतील किंवा महार जातीतील वयोवृद्ध स्त्री करीत असे, तिला सुईण किंवा दायीण असे म्हणतात. ती सुईण बाळाची व बाळंतिणीची आंघोळ तसेच इतर कामे करत असे. त्याबद्दल तिला धान्य व वस्त्राच्या स्वरूपात मोबदला देत असत. बाळंतिण बाईला पाहिले दोन दिवस गुळाचे पाणी पिण्यासाठी दिले जाई व नंतर हलके, मऊ अन्न खाण्यास देत असत. उदा. आंबील, तांदळाची खीर किंवा तांदळाचे उकडलेले वडे इत्यादी.
|