-
जिच्या कर्तृत्वाने व पुण्याईने मुक्ताई देवस्थान प्रसिद्ध पावले ते देवस्थान चिमुर तालुक्यातील डोमा गावाच्या पूर्वेस ३ कि.मी. अंतरावर पेरजागडच्या कडेकपारीत सृष्टी सौंदर्याने नटलेल्या अशा नयनरम्य प्रेक्षणीय जागेत वसलेले आहे. हे स्थळ आदिवासी, शेतकरी व शेतमजुरांचे श्रद्धास्थान बनले आहे.
नागवंशीय माना जमातीचे वैरागड व माणिकगड येथे राज्य होते. त्या काळात डोमा येथे माना जमातीमधील दड्मलची कन्या व श्रीरामे यांची सुन मुक्ताई राहात होती. तिचे माहेर मदनागड येथील असून तिच्या पित्याचे नांव दागोजी दड्मल व आईचे नांव कनकाई होते. मुक्ताईचा जन्म मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला शके १०३५ (इ.स. १११५) ला झाला. दागोजी दड्मल हे मदनागडचे वतनदार होते. मदनागड हे रिठीगांव झाले आहे.
मुक्ताई च्या सात बहिणी होत्या. त्यांची नांवे १) अंबाई २) निंबाई ३) उमाई ४) गौराई ५) मुक्ताई ६) पवराई व ७) भिवराई होते. त्या मोठया साहसी, त्यागी व भाविक होत्या. त्यांचे प्रतीक म्हणून पेरजागडच्या उंच शिखरास सात बहिणींचे शिखर (डोंगर) म्हणतात. वरच्या दगडात सात मुर्त्या कोरल्या आहेत. या शिखराची उंची समुद्रसपाटीपासून १७८० फुट आहे. दक्षिणेस पायथ्याशी ऐतिहासिक सारंगगड हे गांव आहे. ते नंतर रिठीगांव झाले. पुन्हा खालच्या जागेत नव्याने १० वर्षांपूर्वी गाव वसले आहे.
मुक्ताई लहानपनापासूनच धाडसी, बाणेदार व धर्मशील वृत्तीची होती. या परिसरात त्या काळी आस्तिक ऋषीच्या परंपरेतील नागानंद नावाचे साधु पुरुष होते. त्यांच्या विचाराचा प्रभाव मुक्ताईच्या जीवनावर पडला होता.
बाराव्या शतकात इ.स. ११४० ते ११५० या दरम्यान नागवंशीय माना राजे आणि द्रविडवंशीय गोंड राजे यांच्यात सत्ता संघर्ष सुरू झाला. या सत्ता संघर्षामध्ये मुक्ताईचे क्षात्रतेज जागृत झाले आणि नाग (माना), द्रविड (गोंड) यांच्या युद्धात मुक्ताईने उडी घेतली. ही वीरांगणा दुर्गेसारखी लढली आणि शत्रूचा निःपात केला. जमातीच्या रक्षणासाठी व मानांच्या मुक्तीसाठी मुक्ताईने प्रखर झुंज दिली आणि लढता लढता लढता धारातीर्थी पडली व हौतात्म्य पत्करले.
मुक्ताईचे ज्या ठिकाणी बलिदान झाले व तिच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे मुक्ताईचे स्फुर्तिस्थान होय. हिच मुक्ताईचे प्रेरणादायी जीवनगाथा आहे.
मुक्ताईच्या देवस्थानासमोर दोन दगडी चिऱ्यांमध्ये निसर्गनिर्मित विहीर आहे. तिच्या खोलीचा अंत लागत नाही. खनिजाच्या धातू मिश्रणातून दडलेले पाणी जंतूनाशक व रोगप्रतिबंधक आहे. म्हणूनच शेतकरी पिकांवर किड पडल्यावर व तेथील पाणी नेऊन पिकांवर शिंपडतात. त्यामुळे कीड नष्ट होते. हा विज्ञानाचा चमत्कार म्हटला पाहिजे. पण अनेक आदिवासी भाविक मोठया श्रद्धेने पूजा-अर्चा करतात. नवससुद्धा फेडतात. अशी अनेक वर्षांपासून परंपरा सुरू आहे. याच परिसरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भ्रमण केले होते. त्यांच्या आव्हानानुसार मुक्ताईच्या समोर पशुहत्या बंद करण्यात आली. मुक्ताईची प्रेरणा घेतलेले अनेक भाविक लोक या परिसरामध्ये आहेत. अशा या निसर्गरम्य व वनश्रीने नटलेल्या ठिकाणी हे प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. येथे दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला नागदिवाळी उत्सव साजरा करतात. या कार्यक्रमाला हजारो माना जमात बंधू भगिनींची उपस्थिती असते.
|