Home

उत्कृष्ट शाखा शंकरपुर नगरशाखा

उत्कृष्ट शाखा शंकरपुर नगरशाखा
                  गाव संघटन व समाज संघटन काय असते याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे चिमूर तालुक्यातील शंकरपुर नगरशाखा. तसंही चिमूर मध्ये सामाजिक संघटन या शब्दाची बोंबाबोंब आहे. परंतु शंकरपूर येथील विद्यार्थी संघटनेच्या ग्राम शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी संघटनेचे ध्येयांकुर डोळ्यासमोर ठेवून अनेक उपक्रम राबवत गावातील सामाजिक घड़ी व्यवस्थित रित्या बसवलेली आहे. सुरुवातीला आम्ही ग्राम शाखेची आर्थिक घडी बसवण्यासाठी गावातील सांस्कृतिक तसेच इतर सामाजिक कार्यक्रमात जेवण वाढण्याचा उपक्रम राबवला. त्यात सर्व मुलांचा सहभाग होता. त्या पैशामुळे प्रत्येक सामाजिक कार्यक्रम विनावर्गणी साजरा करता आले. याच पैशाच्या माध्यमातून अनेक मुलांना शैक्षणिक मदत सुद्धा करण्यात येत आहे. जेणेकरून आपल्या समाजाचा कोणताही विद्यार्थी शिक्षणा विना राहू नये.
                  शंकरपूर गावात ग्रामपंचायतीच्या मदतीने वाचनालय सुरू केले आहे. या वाचनालयात आपले मुलं जाऊन वाचन करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य वळण मिळत आहे. हे वाचनालय सतत चालू राहावे याकरिता आशिष चौधन यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम शाखेचे सर्व पदाधिकारी कार्यरत असतात. अभिमानाची गोष्ट अशी की या उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी जपान सरकार सल्लागार व आंतरराष्ट्रीय लेखक नागबोधी रुषेन कुसनगी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक करत गावातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
                  विद्यार्थी संघटनेच्या तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय तसेच विदर्भस्तरीय प्रत्येक शिबिरात ग्राम शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग असतोच. शंकरपूर ग्रामशाखेमार्फत २०१८ मध्ये एक महिन्याचे पोलीस भरती प्रशिक्षण आयोजित केले होते. या शिबिराला २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संघटनेच्या माध्यमातून हा नाविन्यपूर्ण उपक्रम होता. शंकरपूर नगरशाखेच्या माध्यमातून मुग्दाई प्रेरणास्थळ डोमा येथे दरवर्षी स्वयंसेवक सुरक्षेकरिता पाठवले जात असतात.
                  महत्त्वाचे म्हणजे गावातील समाजबांधव दारूमुक्त, व्यसनमुक्त व्हावे याकरिता दारू बंदी अभियान राबवत आहोत. हे काम जोखमीचे असले तरी शंकरपुर गावातील महिला संघटन आणि विद्यार्थी संघटनेच्या पुढाकाराने आम्ही दारू माफियांना पुरून उरत आहे. पोलीस प्रशासनाने सहकार्य केले तर शंकरपूर गाव शंभर टक्के दारूमुक्त होईल यात शंका नाही. आमच्या गावात दोन दिवसीय नागदिवाळी कार्यक्रम आयोजित केला जातो. या दरम्यान गावातील स्वच्छते सोबतच इतरही सामाजिक उपक्रम राबवले जातात. मार्गदर्शना सोबतच आपली लोककला दंडारीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. शंकरपुर गावातील भावी पिढीला इतिहासाची जाणीव निर्माण व्हावी. याकरीता दरवर्षी ऐतिहासिक सहलीचे आयोजन केल्या जाते. या अनेक उपक्रमामुळे आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना विदर्भ शाखेने विदर्भातील उत्कृष्ट शाखा म्हणून जमवली येथील शिबिरात गौरव केला होता. याचे सर्व श्रेय गावातील समाज बांधव आणि युवक-युवतींचे आहे. या अनेक उपक्रमात जिल्हा कार्याध्यक्ष निकाभाऊ श्रीरामे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. अशा पद्धतीचे कार्य प्रत्येक गावात व्हावे. अशी मनापासून इच्छा असून यासाठी प्रत्येक गावच्या समाजातील युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी मी करू इच्छितो.

    किसन नन्नावरे,
    नगर शाखाअध्यक्ष शंकरपूर,
    तालुका चिमूर

No comments:

Post a Comment

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून ,डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी

देणगीदारांच्या मदतीच्या सहकार्यातून, डॉक्टरांच्या प्रयत्नाने जान्हवी सुखरूप घरी........... सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद..! जान्हवी विष्णु नार...

Populer post / लोकप्रिय पोस्ट