-
" माना " जमात ही मुळची नागवंशीय जमात आहे. ह्या नागवंशीय माना जमातीची राजसत्ता इसवी सन नवव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत म्हणजे गोंडाचा उदय होईपर्यंत या नागवंशाचे राज्य दक्षिणेस माणिक-गडपर्यंत व पूर्वेस भद्रावती (भांदक) पर्यंत पसरले होते. नवव्या शतकात आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे माना जमातीच्या नागवंशी राजांनी वैनगंगेच्या पूर्वेस सत्ता स्थापन केली होती. पहिला राजा कुरुम प्रहोद होय. याने वैरागड, सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी, राजोली येथे किल्ले बांधले. दुसरा राजा सुरजत बडवाईक त्याने चंद्रपूरच्या आग्नयेस आहेरी जमीनदारीत एका डोंगरावर सुरजागड नावाचा किल्ला बांधला. सुरजत नंतर राजांचे नावे उपलब्ध नाहीत. पण माना चा शेवटचा राजा गहिलू याने चंद्रपूरहून २७ मैलावर दक्षिणेस राजुरा तालुक्यात मणिकगड नावाचा प्रसिध्द किल्ला बांधला. मणिकादेवी वैरागडच्या नागवंशीय राजांच्या घराण्यातील अधिष्ठायी देवता होय. बस्तर संस्थानातील नागवंशीय राजे हे वैरागडच्या राजांचे प्रतिस्पर्धी होते. त्यांचीही अधिष्ठायी देवता माणिकेश्वरी हीच होती. मणिकेश्वरीच्याच कृपेने हा राज्य विस्तार झाला असे समजून त्यास ‘माणिकगड' असे नाव दिले.
" माना " मुळचे मध्यप्रदेश या प्रांतातील बस्तरचे असावेत व मुलुकगीरी करता करता चंद्रपूर जिल्ह्यात स्थिरावले असावेत असे इंग्रज अभ्यासक रसेल यांचे म्हणणे आहे. रामचंद्र देव यादवाने इ.स. १३१० मध्ये वैरागडच्या राज्याचा समूळ उच्छेद केल्याची माहिती उपलब्ध आहे. तरीही ही अखेरची धडपड दिसते. त्यांना आपली सत्ता या प्रदेशावर जास्त वेळ टिकवीता आली नाही त्याचे कारण त्यांना निर्माण झालेले नवीन मुसलमान शत्रु आणि वैरागडच्या नागराजाची दुर्बळ झालेली सत्ता त्याचा फायदा शिरपुर-माणिकगड विभागातील गोंडांनी ताबडतोब घेतला व तेराव्या शतकाच्या पूर्वार्धात माना राजांचा पाडाव करुन गोंडांनी राज्य स्थापण केले. (चंद्रपूरच्या इतिहास, इतिहास पूर्वकाळ ते १८५७ ले.अ.ज. राजुरकर )
माना जमात हि चंद्रपूर जिल्हयातील सध्याच्या भद्रावती (भांदक) तालुक्याचा पूर्ण भाग, वरोरा तालुक्याचा पूर्व भाग, चिमूर तालुक्याचा दक्षिण पूर्व भाग, सिंदेवाही तालुक्याचा पश्चिम-उत्तर भाग, नागभिड तालुक्याचा पुर्व-पश्चिम भाग व ब्रम्हपूरी तालुक्याचा दक्षिण-पूर्व भाग तसेच गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्याचा दक्षिण-पश्चिम भाग, भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील काही भागात हि जमात प्रामुख्याने आढळते. त्यांची मुळची बोलीभाषा त्यांच्या भाटाकडून समजू शकण्याजोगी आहे. माना हे अशिक्षित व अर्धशिक्षितपणा,स्वभावातील हेकडमुजरेपना असल्यामुळे त्यांच्यामधे सिमीत मंत्र विद्या व अंधश्रद्धा यांचा जबरदस्त पगडा असल्यामुळे आधुनिक प्रगतीपथापासून हा समाज अनेक मैल दुर आहे. ९० टके आजही दारिद्ररेषेखाली जगत असून मुख्यत्वेकरुन शेतमजूरी व काही प्रमाणात जंगलमजुरी व काही प्रमाणात शेती करतात.
|