।। जय सरस्वती माता ।। |
०१) जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते, मग ती ताकत असो, गर्व असो, पैसा असो, ज्ञान असो वा भूक असो...! ०२) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दुःख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्याबाबत मी आभारी असले पाहिजे. ०३) शब्दाची सुद्धा आपली एक चव असते, बोलण्याआधी स्वतः ती चाखून बघा... जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार करा. ०४) "समस्या " ही कापसाने भरलेल्या पोत्यासारखी असते, जे फक्त त्या पोत्याकडे बघतात त्यांना ती जड वाटते पण जे ती हाताळतात त्यांनाच खरे वास्तव कळते. ०५) हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख संपते. ०६) आपण कसे दिसतो यापेक्षा, कसे असतो याला अधिक महत्त्व आहे. ०७) गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. ०८) आदर्श गृहिणी ही शेकडो गुरूंहून श्रेष्ठ आहे. ०९) फक्त स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि स्वतःसाठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास. १०) जो त्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो. ११) अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते. १२) तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना. १३) न मागता देतो तोच खरा दानी. १४) चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका. १५) केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो. १६) समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. १७) भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले. १८) दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. १९) शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच. २०) मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही. २१) आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा. २२) एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा. २३) परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी २४) खिडकी म्हणजे आकाश नसतं. २५) जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे. २६) वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन. २७) ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव. २८) तुलना करावी पण अवहेलना करू नये. २९) आवडत तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. ३०) विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. ३१) काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं. ३२) लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं. ३३) चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे. ३४) भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फूल कशासाठी जगायचं हे शिकवते. ३५) कविता म्हणजे भावनांच चित्र. ३६) संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या. ३७) तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल. ३८) स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका आणि स्वतःचा वापर कुणाला करु देऊ नका. ३९) अनुभवासारखा दुसरा गुरू नाही. ४०) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठ सुख आहे. ४१) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. ४२) मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही. ४३) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो. ४४) व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्वीकारा. ४५) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. ४६) अश्रु येणं हे माणसाला हृदय असल्याचे द्योतक आहे. ४७) आयुष्यात प्रेम कारा; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका. ४८) आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही. ४९) तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. ५०) सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या. ५१) चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते. ५२) तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका. ५३) मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका. ५४) प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही. ५५) भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो. ५६) आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा. ५७) उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही. ५८) पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतल पाणी पोहऱ्यात जात नाही. ५९) अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात. ६०) मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो. ६१) रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय मौन. ६२) अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे. ६३) अंथरूण बघून पाय पसरा. ६४) तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा. ६५) कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात. ६६) अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. ६७) सन्मित्र शिपल्यातल्या मोत्यासारखे असतात. ६९) संकट तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच. ७०) तुलना आणि इर्षा करण्यात आपला किंमती वेळ वाया घालवू नका, कारण आयुष्यात आपण जसे कोणाच्या तरी पुढे असतो तसेच कोणाच्या तरी मागेही असतो. ७१) जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार. ७२) लीनता आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत. ७३) ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत. ७४) कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर ते दुर पळतात. ७५) यशस्वी जीवनाची चार सूत्र : मेहनत केली तर धन मिळते..संयम ठेवला तर काम होते..गोड बोलले तर ओळख होते..आदर केला तर नाव होते. ७६) अज्ञानी मनुष्य चुका लपवून मोठा होण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्ञानी मनुष्य चुका सुधारून मोठा होत असतो. ७७) कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्ती पेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल...! ७८) समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही. तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात...! ७९) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. ८०) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. ८१) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान. ८२) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ८३) यश मिळवायचे असेल तर स्वतःच स्वतःवर काही बंधन घाला. ८४) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ८५) ज्याने स्वतःचं मन जिंकले त्याने जग जिंकले. ८६) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास ८७) अपयशाने खचू नका , अधिक जिद्दी व्हा. ८८) निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही. ८९) उद्याचे काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा. ९०) चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा. ९१) नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी . ९२) झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्रच असतो. ९३) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस. ९४) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस. ९५) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्य सोन होतं. ९६) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. ९७) आपण जे पेरतो तेच उगवते. ९८) फळाची अपेक्षा करून सत्कर्म कधीच करु नये. ९९) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १००) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १०१) प्रेम सर्वावर करा पण श्रध्दा फक्त परमेश्वरावरच ठेवा. १०२) आधी विचार करा , मग कृती करा. १०३) आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका. १०५) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री. |