संघटनेमुळे मी काय शिकलो ?
( संघटनेमुळे माझ्यात झालेले बदल, संघटनेतील सकारात्मक आणि नकारात्मक बाबी, संघटनेचा समाजावरील परिणाम, कामाचा आढावा, भविष्यकालीन नियोजन)
आपल्या समाजाच्या संघटना आणि संस्थांशी माझा फारसाविशेष संबंध नव्हता. कृषी पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना 5 मार्च 2016 या दिवशी रवींद्र काळमेघ सर यांच्या घरी विद्यार्थी संघटनेची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये वरोरा वसतिगृहाचे सर्वाधिक विद्यार्थी असल्यामुळे माझी तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाली. प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा असल्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून वर्गणी गोळा केल्याखेरीज आम्ही फारसं काही काम केलं नाही. याच वर्षी माझी सर्च गडचिरोली येथे निर्माण शिबिरासाठी निवड झाली होती आणि जानेवारी महिन्यात पहिले शिबिर सुद्धा पूर्ण केले. 'जे बदल जगामध्ये तुम्हाला पाहिजे आहे त्या बदलाचा तुम्ही स्वतः भाग व्हा आणि करके देखो" महात्मा गांधीचे दोन तत्व हे या शिबिराचा मुख्य पाया आहे. या शिबिरात अनेक कृतिशील सत्रांचा समावेश होता. डॉ अभय बंग उर्फ आमचे नायना म्हणायचे निर्माण शिबिर हे तुमचं प्रशिक्षण आहे. त्यानंतर जे तुम्ही कृती करता, त्यातून काही जे काही तुम्हाला मिळेल ते म्हणजे शिक्षण." विचारांची आणि सामाजिक कामाच्या कौशल्याची शिदोरी घेऊन परतलो होतोच. निर्माणच्या प्रशिक्षणाचा योग्य वापर आणि कृती करण्याची उत्तम संधी मला संघटनेच्या माध्यमातून मिळाली आली होती.
काळमेघ सर आणि संजय जांभुळे सर यांनी मे महिन्याच्या शेवटी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सलोरी येथे करण्याचा संकल्प व्यक्त केला. या शिबीराचा प्रसार करण्यासाठी निखिल राणे आणि मी वरोरा तालुक्यातील गावा गावात फिरलो. त्यामुळे 80 ते 90 विद्यार्थी शिबिरात सहभागी झाले. काळमेघ आणि जांभळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीराचे यशस्वी आयोजन करता आले. या शिबिरामध्ये आमचे व्यवस्थापन गुरू अरुण चौधरी सर यांनी संघटनेविषयी दोन गोष्टी सांगितल्या,
1. संघटना ही ज्वारीच्या शेतात दोरीला बांधलेल्या टापरासारखी असावी एका ठिकाणाहून दोरी ओढली तर सर्व टापरं वाजली पाहिजे.
2. सामाजिक काम हे एक शास्त्र (सायन्स) आहे. ज्या पद्धतीने शास्त्रामध्ये दोन रसायने एकत्र केल्यानंतर विशिष्ट तिसरं रसायन तयार होते. समाजिक काम शास्त्रीय पद्धतीने करायला पाहिजे व आपण ठरवलेला विशिष्ट आउटपुट निघायलाच पाहिजे. असं जर झालं नाही तर आपलं रसायन चुकलं असं समजावं. आपल्या सामाजिक कामाच्या पद्धती बदलाव्या.
या दोन गोष्टी या शिबिरात मला पण शिकायला मिळाल्या. तिसरी गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे अभय ननावरे आणि प्रशांत जांभुळे यांच्या सत्रांव्यतिरिक्त दुसरी भाषणबाजीचे सत्र मुलांना आवडत नाही.
या शिबिराचे महत्वाचे आउटपुट असे की जवळपास 25 गावातील विद्यार्थी संघटनेशी जोडले गेले त्यावेळचे तालुका सहसंघटक विलास चौधरी यांनी गावागावात ग्राम शाखा तयार करण्याचा आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्याचा प्रस्ताव शिबिरात ठेवला. त्यानंतर विलास चौधरी, निखिल राणे, कुलदीप श्रीरामे आणि मी सायंकाळी गावागावात जाऊन संघटनेच्या शाखा बनवण्यास सुरुवात केली.
या अगोदरचा अनुभव असा होता की ग्राम शाखा तयार करायची असेल तर तालुक्याला बोलावून तयार करण्यात येत होती. परंतु निर्माण शिबिरात शिकलेल्या "Go to the People' या तत्त्वानुसार आम्ही लोकांपर्यंत पोचलो आणि गावात शाखा तयार केली. हे करत असताना लोकांशी संपर्क कसा करायचा? लोकांना एकत्र गोळा कसे करायचे? गोळा झालेल्या लोकांसमोर शब्दांची मांडणी कशी करायची? त्यांना संघटनेचे महत्व कसे समजून सांगायचे? शाखा तयार करण्याची नेमकी प्रक्रिया काय असावी? या सर्व गोष्टी मी कुशल संघटक व वक्ता असलेल्या विलास चौधरी यांच्याकडून शिकलो. आपला समाज स्वतःची संस्कृती इतिहास आणि अस्तित्व हे कसा विसरलेला आहे. अशी ढोबळ मांडणी त्यांच्या भाषणाची राहत असे. काही गावात युवा विद्यार्थी एकत्र यायला नकार देत होते. तेव्हा आम्ही घरोघरी जाऊन त्यांना गोळा करत होतो. काहींना तर जबरदस्तीने मीटिंग मध्ये बसवण्याच्या अनुभव आम्हाला आला. तेच पुढे संघटनेचे उत्तम कार्यकर्ते झाल्याचे दिसले.
हे सर्व करत असताना समाजातील लोक प्रश्न पण विचारायचे. समाजात तर भरपूर संघटना आहेत त्या आपापल्या परीने समाजासाठी काम करतही आहे. काही संघटना निष्क्रिय सुद्धा झालेले आहे. व्हॅलिडीटी मिळत नाही तरी पण त्या झोपलेल्याच आहे. आता तुम्ही असा कोणता तीर मारणार आहात? इतिहास, संस्कृती, अस्तित्व, निष्क्रिय संघटना, व्हॅलिडीटी आणि तुम्ही असा कोणता तीर मारणार आहात? यातून एक सर्वात मोठी चूक लक्षात आली. ती म्हणजे आपल्या समाजातील संघटनांचा व्हॅलिडीटी हा एकमेव अजेंडा आहे. व्हॅलिडीटी मिळाली नाही तर आपल्या समाजातील संघटना कृतिशील असतात आणि चालू झाले की निष्क्रिय होतात याची पुनरावृत्ती आम्हाला टाळायची होती. ही चूक सुधारण्यासाठी ध्येयांकुर नावाचे व्हिजन डॉक्युमेंट जन्माला आले. निर्माणमधून मिळालेल्या व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाच्या भरोशावर त्याचा थोडक्यात मसुदा तयार केला. संघटनेचा उद्देश फक्त व्हॅलिडीटीच नसला पाहिजे तर शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विकास हे सुद्धा असायला हवे. हे लोकांनी शिकवलं. खऱ्या अर्थाने संघटनेने शिकवल.
जवळपास वरोरा तालुक्यात 40 ग्राम शाखा तयार झाल्यानंतर 12 जून 2016 ला गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा खेमजई येथे आयोजित केला. त्या सोहळ्याला जवळपास 250 च्या वर युवा वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. या सोहळ्यात आम्ही सर्व विद्यार्थ्यांना विषय वाटून दिले त्यांच्याकडून ध्येयांकुर याविषयी लिखित मत घेऊन परिपूर्ण ध्येयांकुर तयार केले. ध्येयांकुर तयार झालं आणि खऱ्या अर्थाने संघटनेला अल्पकालीन आणि दीर्घकालीन ध्येय मिळालं.
या कार्यक्रमात एक किस्सा घडला. तो सहकार्यांनाही मी बोलून दाखवतो. गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात काही मान्यवरांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे खूपच लांबलचक भाषणे केली. त्याचा परिणाम असा झाला की कार्यक्रम लांबणीवर गेला. नियोजन 5 वाजेपर्यंतचे होते. परंतु त्याला 6 वाजले. वेळेच्या व्यवस्थापनात महारथ प्राप्त केलेल्या अरुण चौधरी सरांना याचा फार संताप आला. ते बाहेर निघाले. तेव्हा मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी मला एक तास झापले. कार्यक्रमाची नियोजन 5 वाजेपर्यंतचे होते आणि आता तर 6 वाजले आहे. सायंकाळी होत आहे. गावागावातून विद्यार्थी आलेले आहेत. त्यांना परत जायचे आहे. काहींची गावे जवळ आहेत. तर काहींचे दूर आहेत. काही विद्यार्थ्यांना जंगलातून जावे लागते. हा प्रवास करत असताना विद्यार्थ्यांचे काही बरे वाईट झाले तर त्याची जबाबदारी तुम्ही घ्याल का? कार्यक्रमाचे आयोजक तुम्ही आहात कोणत्या मान्यवरांनी किती लांब भाषण करायचे ते ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे. परंतु ते तुम्ही केले नाही. त्यामुळे कार्यक्रम लांबणीवर गेला आणि विनाकारण लोकांचा वेळ वाया गेला. कार्यक्रमाचं असं पण असते हे पहिल्यांदा माहिती झालं आणि डोक्यात चक्क प्रकाश पडला. कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडावा यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली होती. एवढे कष्ट करूनही भर भाषणात संघटनेची व आमच्या कामाची प्रशंसा करणारा माणूस आपल्यावरच ताशेरे ओढत आहे. याचे आश्चर्य पण वाटले. काही काळापुरते फार वाईट वाटले. परंतु लांबलचक भाषणाचा मलापण तिटकारा वाटत असल्याने त्यांचे बोलणे मला लगेच पटले. संघटनेचा मोरक्या म्हणून आपण कार्यक्रमासाठी बोलावलेल्या विद्यार्थ्यांप्रती आपली पण जबाबदारी आहे हे पटकन उमगले. कार्यक्रमानंतर सायंकाळी प्रत्येक गावच्या मुलांना मी फोन करून विचारले की तुम्ही घर पर्यंत सुखरुप पोहोचले आहे किंवा नाही. तेव्हापासून कोणत्याही कार्यक्रमात वेळेचे व्यवस्थापन याला प्राधान्य देत गेलो मी स्वतः नाग दिवाळी आणि इतर कार्यक्रमात क्वचितच भाषणाला जातो. इतर सहकार्यांना जबरदस्तीने स्पष्ट शब्दात वेळेचे पालन करण्यास सांगतो. यामुळे संघटना शिस्त आणि नैतिक नियंत्रण यासाठी ओळखली जाऊ लागली. संपूर्ण विदर्भात संघटना अतिशय वेगाने पसरली अनेक कार्यकर्ते यामुळे दुरावलेही. यातील काही कार्यकर्ते भाषणात लोकांना वेळेचे महत्त्व पटवून सांगतात.
गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यानंतर आम्ही वरोरा तालुक्यात वटपौर्णिमेच्या दिवशी 17 जून 2016 ला वृक्षलागवड पौर्णिमा हा उपक्रमही राबवला. याच दरम्यान मला अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे एमएससी साठी प्रवेश मिळाला. तिकडे व्यस्त झाल्याने तिकडे थोडं लक्ष कमी झाले.
2014 यावर्षी नव्याने तयार करण्यात आलेला विद्यार्थी संघटनेचा राजकीय हस्तक्षेप बघून वाईट वाटले होते. दलित पँथर, शेतकरी संघटना याची उदाहरणे समोर असल्यामुळे विद्यार्थी संघटनेच्या राजकारणात प्रत्यक्ष हस्तक्षेप नकोच. या हट्टा पोटी एमएससी प्रवेश प्रक्रिया आटोपल्यानंतर 10 ऑगस्ट 2016 ला सालोरीला बैठक घेतली. त्यात संघटनेची नियमावली तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्या प्रस्तावाला सर्व सहकाऱ्यांनी दुजोरा देत. थोडक्यात त्याचा मसुदा तयार करून घेतला. त्यात विविध विषयासोबतच संघटनेचा कुठेही राजकीय हस्तक्षेप असणार नाही असा नियम पण करून घेतला. महत्त्वाचं म्हणजे अशी नियमावली चंद्रपूर जिल्हा शाखेने सुद्धा तयार केली नव्हती. त्यामुळे जिल्ह्याची नियमावली नसताना तालुका शाखेने नियमावली तयार कशी काय केली? असाही विनाकारणचा आक्षेपही नोंदविण्यात आला. त्यामुळे त्यांना विनंती केली की या नियमावलीचा आधार घेऊन आपण जिल्हा शाखेची नियमावली बनवूया. ते झालंच.
नंतर 23 नोव्हेंबर 2016 या आदिवासी गोवारी शहीद दिनी वरोरा उपविभागीय कार्यालयावर संघर्ष रॅलीचे आयोजन वरोरा तालुका विद्यार्थी संघटनेच्यावतीने करण्यात आले. हे करत असताना विद्यार्थ्यांना मोर्चा आंदोलनात सहभागी करणे चुकीचे आहे. असेही मत काही जाणकारांकडून व्यक्त करण्यात आले. ते योग्यही होते. परंतु अरुण सर, जांभळे सर, काळमेघ सर, हरिदास दादा, शंकर बरडे सर यांच्या मार्गदर्शनातून संघर्ष रॅलीचे सर्वोत्तम नियोजन करण्यात आले आणि संघर्ष रॅली कोणतेही गालबोट न लागता पार पाडली. त्यासाठी खूप कौतुकही झाले. यातून मोर्चा आंदोलन याचे नियोजन कसे करायचे, हे मी शिकलो.
या संघर्ष रॅलीचा फायदा असा झाला की बाकी जिल्ह्यातील युवकांना वाटले की अशी संघटना आपल्या जिल्ह्यात पण असायला पाहिजे. त्यासाठी हालचाली सुरू झाल्या. त्यातूनच विदर्भ संघटनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. विदर्भस्तरीय शिबिरे आयोजित करणे सुरू झाले. अर्थातच अशा शिबिरांचे सूक्ष्म नियोजन करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर राहत असे. ती आजही आहे.
विविध उपक्रमांचा सपाटाच सुरू असल्याने संघटनेची आर्थिक बाजू सुद्धा मजबूत झाली होती लोकांनी दिलेल्या पैशाचा काटेकोर हिशोब कसा ठेवायचा हे सुद्धा मी शिकलो आणि जमाखर्चाचा वार्षिक अहवाल तयार करण्यास सुरुवात केली यामुळे लोकांचा विश्वास कायमचा बसला.
संघटनेत काम करत असताना अनेक छोट्या मोठ्या चुका झाल्या. त्यासाठी बोलणी ऐकावी लागली. ते आजही सुरू आहे. म्हणून आपल्या हातून कोणतीही चूक होऊ नये यासाठी स्वतःचे चारित्र्य, नीतिमत्ता सांभाळायला शिकलो. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता, कार्याप्रती प्रामाणिकता, चारित्र्य आणि नीतिमत्ता असली तर लोक बोट उचलत नाही हे सुद्धा अनुभवलं.
संघटनेमुळे माझ्यात झालेले बदल
• सकारात्मक बदल:
निर्माण मधून घेतलेल्या प्रशिक्षणाचा सदुपयोग करता आला. त्यातून मिळालेल्या कौशल्याचे यशस्वी अंमलबजावणी करता आली. त्याच्यामुळे आत्मविश्वास खूप वाढला. एखाद्या सामाजिक कामाचे मूल्यांकन कसे करायचे हे प्रत्यक्ष शिकलो. जीवनाच्या चार भागांपैकी एक भाग संघटना झाली. त्याच्यामुळे असा एकही दिवस नाही ज्या दिवशी संघटनेचे काम केलेले नाही. संघटना आणि समाज सतत क्रियाशील रहावा यासाठी वेगवेगळे उपक्रमांबद्दल विचार करणे सुरू झाले. विविध उपक्रम नेहमी सुचतात. त्याची अंमलबजावणी करण्याची निडरता निर्माण झाली. एखादा उपक्रमाची सुरुवात करणे फार कठीण जाते. परंतु सतत कार्यरत राहिल्यामुळे कोणताही उपक्रम सुरुवात करण्याची भीती नाहीशी झाली.
• नकारात्मक बदल:
लोकांसोबत उद्दिष्टपूर्ण काम करत असताना चिडचिडपणा वाढली. लोकांसाठी काम करणं फार सोपं असतं. पण लोकांसोबत करणं फार कठीण, हे जाणवलं. न बदलणाऱ्या फटकळ स्वभावामुळे अनेक लोकं तुटली. त्यामुळे लोकांसोबत काम करणे शक्यतो वर टाळतो. ते काम वाल्मीक भाऊ आणि विलास गुरुजी उत्तम रीतीने सांभाळतात. वरील कारणामुळे कार्यकर्त्यांसोबत डायरेक्ट संपर्क येऊ नये यासाठी संघटनेचा राजीनामा सुद्धा दिला. परंतु संघटनेत आजही सक्रिय आहे.
• संघटनेच्या सकारात्मक बाबी:
संघटनेमुळे माना जमातीचे खरे संस्कृतीक उच्चाटन झाले असे मला वाटते. समाजाला एकसंघ व एका छत्राखाली आणण्याचा फार मोठा प्रयत्न विद्यार्थी संघटनेने केला. लोकशाही असलेल्या देशात 100 टक्के या गोष्टीत कधीच आपण यशस्वी होणार नाही. हे जाणून होतोच. परंतु संघटनेमुळे एकमेकांच्या संवेदनांशी-सुखदुःखाशी-हितकारक उपक्रमाशी समाज जोडला गेला. याचे उदाहरणे (मोनाली घरत, पवन ननावरे, पुनम मुंडरे, वैष्णवी दोडके, मॅजिक) यांच्या माध्यमातून वेळोवेळी आपल्याला दिसतात.
• संघटनेच्या नकारात्मक बाबी:
संघटनेच्या सकारात्मक बाबी अगणित आहे. थोड्याफार नकारात्मक बाबी आहेत.
1. कलामंचची निर्मिती:
पथनाट्य, गाणे, भाषण यातून पूर्ण जनजागृती होऊ शकत नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. कलामंचात संघटनेतील सक्रिय कार्यकर्ते नाचणे आणि गाणे यासाठी जास्त वेळ देऊ लागली. विलास चौधरी यांचासारखा कलामंच आणि संघटना यात समन्वय करणे इतरकार्यकर्त्यांना जमलेच नाही. मला वेळ नाही म्हणणारे कार्यकर्ते रात्री बेरात्री कलामंच साठी दुसऱ्या जिल्ह्यात जाताना दिसतात. कलामंचमध्ये गैरकृत्य घडली. त्यामुळे कलामंचला संघटनेतून बादही केले. सुरवातीला कलामंचाची निर्मिती वरोरा तालुक्यात झाली याचा कायम पश्चाताप आहे.
2. नारायण जांभुळे यांच्या चंद्रपूर मोर्चाला विरोध:
संघटनेच्या या निर्णयामुळे विद्यार्थी संघटनेच्या दोन ग्रामशाखा तुटल्या. वाद विवाद झाले. आजपर्यंत समजावता आले नाही. कारण तो आकसापोटी घेण्यात आलेला निर्णय मुळातच चुकीचा होता, हे आज जाणवते. अशी निर्णय संघटनेने घेऊ नये असे मनोमन वाटते. सहकार्य करू नका परंतु विरोधही करू नका. अशी संघटनेला दहा बोटाची विनंती राहील.
3. संघटनेचा राजकीय हस्तक्षेप:
ऍरिस्टॉटलने म्हटल्याप्रमाणे प्रत्येक माणूस हा राजकारणी आहे" त्याच्यामुळे संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या राजकीय आकांक्षा लपत नाही. परंतु या आकांक्षापोटी संघटनेवर कसे नकारात्मक परिणाम झाल्याचे उदाहरण म्हणजे 2019 ची निवडणूक. या निवडणुकीने अनेक लोकं एकमेकांपासून तुटली. याचे उदाहरण यवतमाळ जिल्हा शाखा आहे. संघटनेचा राजकीय हस्तक्षेप कसा असावा? याचे उदाहरण वरोरा तालुक्यातील राजू भाऊ गायकवाड यांचे आहे. त्याचा अभ्यास करावा.
4. बौद्धिक कमकुवतपणा:
आजही संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये अभ्यास, चिंतन, कृती, अंमलबजावणी याची कमतरता जाणवते. एकमेकांशी संवाद, समन्वय, निर्णय प्रक्रिया यात कमकुवतपणा दिसतो. संघटनेच्या उद्देशाला सर्वोच्च स्थान देणे गरजेचे असते. त्यासाठी झोकुन काम करण्याची महत्वकांक्षा निर्माण करावी लागते. परंतु हेच ज्ञान लोकांना पाजणारे त्यावर अंमलबजावणी करताना दिसत नाही. संघटना आणि संघटनेचा उद्देश यापेक्षा प्रेमप्रकरण, वादविवाद, मतभेद मनभेद या गोष्टी दुय्यम असतात. हे समजायला कार्यकर्त्यांमध्ये कमजोरीपणा दिसते.
• संघटनेचा समाजावरील परिणाम:
ग्राम शाखांची निर्मिती संघटनेच्या 400 च्या जवळपास ग्रामशाखा तयार करण्यात आल्या. हा एक संघटनात्मक कामाचा उत्कृष्ट नमुना आहे. गावात काही बरे वाईट झाले तर लोकांना संघटना हा एक महत्त्वाचा आधार वाटतो. त्याचे अनेक उदाहरणे देता येईल. चिमूर तालुक्यातील शंकरपूर नगर शाखा असो की वरोरा तालुक्यातील अर्जुनी ग्राम शाखा याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहेत.
• सामाजिक:
आदिवासी आणि नैसर्गिक संस्कृतीचा प्रचार संघटनेच्या वतीने करण्यात आला. त्यामुळे समाजातील असंख्य वाईट चालीरीती कमी करता आल्या. माझ्या घरातून घटपूजा, सत्यनारायण, लक्ष्मीपूजन, बुवाबाजी अंधश्रद्धा या गोष्टी हद्दपार झाले आहेत. हा एक संघटनेचा फार मोठा परिणाम म्हणता येईल अशी असंख्य उदाहरणे देता येईल. समाजात खऱ्या अर्थाने बहुजनवादी परिवर्तनवादी आणि विज्ञानवादी विचारधारा फोटो ठेवण्याचे कार्य विद्यार्थी संघटनेने केले.
• सांस्कृतिक:
समाजाचे सांस्कृतिक उच्चाटन खऱ्या अर्थाने विद्यार्थी संघटनेने केले असे माझे ठाम मत आहे. नागदिवाळी
सारखा सण गावागावात साजरा करने हे संघटनेचे फार मोठे यश आहे. यातून असंख्य चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. असंख्य सुधारणा करणे आवश्यक आहे, असे वाटते.
• ऐतिहासिक:
संघटनेमुळे इतिहास गावागावात पोहोचला. समाजातील लोक आपल्या गड किल्ले आणि प्रेरणा स्थळांना मोठ्या
स्वाभिमानाने भेटी देऊ लागली.
शैक्षणिक संघटनेच्यावतीने आजपर्यंत जवळपास 40 च्या वर शिबिर आयोजित करण्यात आले. यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच मॅजिक नावाचा उपक्रम हे संघटनेचा फार मोठे आणि ठळक यश आहे. जन्मदिवसाला केक कापणारे समाज बांधव आता मॅजिक ला देणगी देताना दिसत आहे. ज्या समाज बांधवांचे हातावर घेणे आणि पानावर खाणे अशी परिस्थिती आहे. असे समाज बांधव सुद्धा मॅजिकला मदत करताना दिसत आहे.
• संवेदनशीलता:
मोनाली घरत, पूनम, वैष्णवी दोडके या मुलींचा जीव वाचावा. यासाठी लाखो रुपयांची मदत करणारा समाज
क्वचित दिसतो. असे दुसऱ्या समाजातील लोक म्हणतात. या यशाच मुल्यांकन करणे फार कठीण आहे.
कामाचा आढावा
• 400 ग्राम शाखा.
• 40 शिबिर
• दहा-बारा आंदोलन मोर्चे
• अनेक अन्याय अत्याचार विरोधात उठवलेला आवाज यावरच वेगळे पुस्तक तयार होऊ शकते.
भविष्यकालीन नियोजन
1. संघटनेने स्वतःची बौद्धिक व आर्थिक ताकद वाढवावी व त्यानंतर लोकांना सुद्धा सक्षम करावे.
2. ऐतिहासिक स्थळांचा विकास होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा.
3. नागदिवाळी सारख्या उत्सवामध्ये समाजपयोगी उपक्रम राबवावे. शक्यतोवर फक्त सजावट, बडेजावपणा, महागडे जेवण, मनोरंजन यासारख्या गोष्टी न करता रचनात्मक कार्याकडे कल असावा.
4. मॅजिक उपक्रमाला बहुआयामी बनण्यासाठी वेळ द्यावा. मनुष्यबळ पुरवावे. आरोग्य आणि शिक्षण यावर जास्त लक्ष केंद्रित करावे.
5. अमरावती जातवैधता तपासणी समिती मधील समस्या सोडवाव्यात.
6. संघटनेच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी एक कार्यालय असावे.
7. उच्च दर्जाची संपर्क प्रणाली तयार करावी. संघटनेची वेगळी राजकीय शाखा तयार करावी.
8. ध्येयांकुर मध्ये दिल्याप्रमाणे प्रत्येक उपक्रमासाठी कुवत, आवड आणि कौशल्यानुसार जबाबदारी वाटून द्यावी.
नाव: श्रीकांत श्रीरंग एकुडे